भारतातील अभयारण्ये

 

भारतातील पर्यटन स्थळे असलेली अभयारण्ये

भारतांतील ही अभयारण्ये व राष्ट्रीय उद्याने पर्यटनाची केंद्रे बनली आहेत. उदा. गीर अभयारण्य , रणथंबोर अभयारण्य , कान्हा नॅशनल पार्क इ.  या विषयी थोडक्यात माहिती पाहू .

भारतात प्राकृतिक रचना व हवामान यात खूप फरक असल्यामुळे विविध जातीचे प्राणी व पशुपक्षी आढळतात. सर्वेक्षणानुसार भारतात 300 पेक्षा जास्त जंगली प्राण्यांच्या जाती आणि 1000 पेक्षा जास्त वनस्पतींचे प्रकार आहेत. पर्यावरणानुसार वन्य पशुपक्षी आणि वनस्पती अतिशय महत्वाच्या ठरतात .

परंतु अलीकडील काही वर्षात मोठ्या प्रमाणांत झालेली पशुपक्ष्यांची हत्या आणि जंगलतोड यामुळे पशुपक्षी आणि वनस्पतींचे संवर्धन करण्याची गरज आहे. यासाठी प्राणी व पक्षी यांचे संवर्धन करण्याच्या हेतूने भारताच्या निरनिराळ्या भागात अभयारण्ये व राष्ट्रीय उद्याने निर्माण करण्यात आली . यामुळे प्राणी व पक्ष्यांच्या संवर्धनाबरोबर वनस्पतींचेही संवर्धन होते.  तसेच या उद्यानांचा पर्यटन विकासासाठी उपयोग झाला आहे. भारतातील अभयारण्ये पुढीप्रमाणे आहेत.

 

1. गीर अभयारण्य

गुजरातमध्ये जुनागडपासून 125 कि.मी. अंतरावर असलेले हे अभयारण्य आहे. भारतातच नव्हे तर संपूर्ण जगात सिंहासाठी प्रसिद्ध आहे. गीर अभयारण्याचे एकूण क्षेत्रफळ 360 चौ. कि.मी. आहे. हा भाग लहानमोठे डोंगर, टेकड्या व दर्यानी बनलेला आहे. या भागात वेगवेगळे मोसमी प्रकारचे वृक्ष व गवत आढळते. या क्षेत्रातून लहान नद्या व ओहोळ वाहतात. या अभयारण्यांत सिंहांची संख्या सर्वात जास्त आहे. सिंहाशिवाय येथे चितळ, सांबर, डुक्कर, कोल्हे, जंगली मांजरे इत्यादी प्रकारचे वन्यप्राणी आणि निरनिराळे पक्षी आढळतात. साधारणपणे डिसेंबर ते फेब्रुवारी आणि एप्रिल ते मे या काळात हे उद्यान व्यवस्थितपणे पाहता येते. सासन हे जवळचे रेल्वे स्टेशन असून केशोड हा विमानतळ 80 कि.मी. अंतरावर आहे.

 

2 . नागार्जुनसागर अभयारण्य

आंध्रप्रदेशात कृष्णा नदीवर बांधलेल्या धरणाच्या नागार्जुनसागर जलाशयाच्या जवळ हे भारतातील सर्वात मोठे वाघांचे अभयारण्य आहे. या अभयारण्यांत विस्तृत पठारे, खोल दऱ्या असून येथे पानझडी वृक्ष आढळतात. या अभयारण्याचे क्षेत्रफळ 3560 चौ. कि.मी. असून ऑक्टोबर ते जून हा काळ पर्यटनासाठी उत्तम मानला जातो. वाघ हा या अभयारण्यातील महत्वाचा प्राणी असून , असून चित्ते, बिबळ्या, अस्वले, नीलगाई, चौशिंगा, सांबर, चितळ, हरिण, रानडुकरे, माकडे हे प्राणीही मोठ्या प्रमाणांत आढळतात. या अभयारण्याला पर्यटनासाठी जाण्यासाठी हैद्राबाद हा जवळचा विमानतळ आणि मंचेरील हे रेल्वे स्टेशन आहे.

 

3 . कान्हा नॅशनल पार्क

मध्य प्रदेशातील हे उद्यान वाघासाठी प्रसिद्ध आहे. कान्हा उद्यानातक इतके विविध प्राणी आढळतात कि ते भारतातील दुसऱ्या उद्यानात पाहायला मिळत नाहीत. याचा उल्लेख ‘व्याघ्रभूमी’ असा केला जातो. पठारावरील घोड्याच्या टाचेसारख्या ( नाल) नदी खोऱ्यात असणाऱ्या या उद्यानात वेगवेगळ्या 22 जातीचे प्राणी आढळतात.

येथील उद्यानात पानझडी झुडांची जंगले मोठ्या प्रमाणावर आढळतात. कान्हाचे क्षेत्रफळ 940 चौ. कि.मी. आहे. फेब्रुवारी ते जून हा प्राणी निरीक्षणाचा कालावधी आहे. वाघ, चित्ता, हरसिंगा, सांबर, चितळे, चौसिंगा, निलगाई, माकडे येथे मोठ्या संखेने आढळतात. अनेक प्रकारच्या पक्ष्यांनी हे उद्यान समृद्ध बनलेले आहे. मंडला हे जवळचे शहर असून ते 55 कि.मी. अंतरावर आहे.

 

4. काझीरंगा अभयारण्य

आसाममधील ब्रह्मपुत्रा नदीच्या काठावरील गुवाहाटीपासून 220 कि.मी. अंतरावर हे अभयारण्य आहे . हे अभयारण्य एकशिंगी गेंड्यासाठी जगप्रसिद्ध आहे. या अभयारण्याचे एकूण क्षेत्रफळ 430 चौ. कि.मी. आहे. येथे हत्तीच्या पाठीवरून सवारी करता येते आणि यावरून एकशिंगी गेंडा पाहण्याचा पर्यटकांसाठी अनुभव अवर्णनीय असतो.

या अभयारण्यात 1978 साली 1000 गेंडे होते. या अभयारण्यांत गेंड्याशिवाय गवा, वाघ, हरसिंगा, डुकरे, चितळ, चित्ता, अजगर, ससाणे आणि विविध पक्षी मोठ्या संखेने आढळतात. नोहेंबर ते मार्च या दरम्यानचा काळ हे अभयारण्य पाहण्यासाठी उत्तम मानला जातो.

 

5. भरतपूर अभयारण्य

राजस्थानमध्ये भरतपूर शहरांजवळ पक्ष्यांसाठी प्रसिद्ध असलेले हे भरतपूर अभयारण्य आहे. हे अभयारण्य सुमारे 30 चौ. कि.मी. क्षेत्रात पसरले आहे. हा पाणथळीचा भाग आहे आणि म्हणून येथे विविध जातीचे पक्षी आढळतात. भारतात सर्वात जास्त पक्ष्यांच्या जाती येथे आढळतात.

येथे भारतीय पक्ष्यांशिवाय सैबैरिया व मध्य आशियातील स्थलांतरित पक्षी देखील आढळतात. यात बगळे, ससाणे, शीळ घालणारे पक्षी, गरूड इत्यादी विविध रंगाचे पक्षी प्रमुख आहेत. येथे हरिण, सांबर, चितळ, लांडगे, कोल्हे, मासे खाणारी मांजरे हे प्राणीही आढळतात. येथील पक्ष्यांचे निरिक्षण वर्षभरही करता येते. वर्षभर हे उद्यान पाहता येते.

 

6. जिम कॉर्बेट नॅशनल पार्क

भारतामधील उत्तराखंड राज्यातील जिम कॉर्बेट नॅशनल पार्क हे वन्यजीव अभयारण्य आहे. हे भारतातील पहिले राष्ट्रीय उद्यान आहे. हे उद्यान इ.स. 1836 मध्ये सुरू करण्यात आले. हे उद्यान नैनितालपासून 120 कि.मी. अंतरावर आहे. हे उद्यान वाघासाठी प्रसिद्ध असून एकूण क्षेत्रफळ 530 चौ. कि.मी. आहे. हा भाग डोंगर दऱ्यांचा असून येथे साल, पाईन वृक्ष व गवत भरपूर प्रमाणात आढळते. या भागातून रामगंगा नदी वाहते. त्यामुळे तेथे निरनिराळे वन्य प्राणी आढळतात.

वाघांशिवाय येथे हत्ती, चितळ, हरिण, चित्ते, अस्वल, मोर आणि विविध पक्षी आढळतात. येथील प्राणी पक्षी पाहण्यासाठी डिसेंबर ते एप्रिल हा कालावधी चांगला समजला जातो. नरभक्षक वाघांची शिकार करणाऱ्या जीम कार्बेट या जगप्रसिद्ध शिकाऱ्याचे नांव या राष्ट्रीय उद्यानाला दिले आहे. त्यापूर्वी या उद्यानाचे नांव ‘हॅले नॅशनल पार्क’ असे होते.

 

7. रणथंबोर राष्ट्रीय उद्यान

हे उत्तर भारतातील राजस्थानमधील सवाई माधोपूर शहराजवळ एक विस्तीर्ण असे असणारे उद्यान म्हणजे रणथंबोर राष्ट्रीय उद्यान आहे. येथे मोठ्या संख्येने वाघ, बिबट्या आणि मार्श मगरी आहेत. त्‍याच्‍या खुणांमध्‍ये डोंगरमाथ्यावर असलेला 10 व्‍या शतकातील रणथंबोर किल्‍ला आणि गणेश मंदिर मंदिराचा समावेश आहे.

हे पूर्वीचे शाही शिकारीचे ठिकाण होते . तसेच उद्यानात, पद्म तलाव आहे. राजस्थानातील रणथंबोर या उद्यानातील वाघ देशातील इतर अभयारण्यातील वाघांपेक्षा अधिक माणसाळलेले आहेत. अरवली पर्वत क्षेत्रात या उद्यानाचा विस्तार आढळतो .

उंच सखल प्रदेश, पानझडी वृक्षांची जंगले व ढोक पक्ष्यांचे मोठे प्रमाण ही या उद्यानाची वैशिष्ट्ट्ये आहेत. या उद्यानाचे एकूण क्षेत्रफळ 392 चौ. कि.मी. असून प्राणी निरीक्षणाचा कालावधी ऑक्टोबर ते एप्रिल आहे. वाघ, चित्ता, बिबळ्या, मगर, कोल्हा, लांडगा, डुकरे हे प्राणी, ससाणा, गरूड, बदक, स्टॉर्क, स्पिन बीक तसेच इतर अनेक पक्षी येथे आढळतात. सवाई माधोपूर रेल्वे स्टेशन 14 कि.मी. अंतरावर आहे. तसेच जयपूर विमानतळ येथून 132 कि.मी. अंतरावर आहे.

 

8. नॉर्थ सिमलीपाल राष्ट्रीय उद्यान

भारतातील व्याघ्र प्रकल्पाची येथूनच सुरुवात झाली.पश्चिम बंगालमधील हे राष्ट्रीय उद्यान देशातील पहिले व्याघ्र अभयारण्य म्हणून ओळखले जाते. मयूरव संस्थानच्या महाराजांचे हे राखीव जंगल होते. पानझडी झाडांची दाट जंगले येथे आहेत . हे उद्यान उंचसखल असून येथून पाण्याचे 12 झरे व नद्या वाहतात.

पशुपक्ष्यांनी हे उद्यान समृद्ध आहे. हे उद्यान 303 चौ. कि.मी. क्षेत्रावर पसरले आहे. येथील प्राणी निरीक्षणाचा कालखंड ऑक्टोबर ते जून आहे. वाघ हत्ती, चित्ते, बिबळ्या, सांबर, चितळ, हरिण, रानटी कुत्री, रानडुकरे, चौसिंगा, मोठी खार, माकड है प्राणी मोठ्या संखेने आहेत. अनेक पक्षीही येथे आढळतात. कोलकत्ता विमानतळ येथून जवळ असून ते 240 कि. मी. अंतरावर आहे.

 

9. सुंदरबन राष्ट्रीय उद्यान

गंगा व ब्रह्मपुत्रा या दोन नद्यांनी वाहून आणलेल्या गाळामुळे निर्माण झालेल्या मैदानी प्रदेशात सुंदरबन राष्ट्रीय उद्यान आहे. या उद्यानाचे क्षेत्र सुमारे 2600 चौ. कि.मी. आहे. येथे सुंदरी वनस्पती (Mangrove) मोठ्या प्रमाणात वाढतात. वाघ हा या जंगलातील प्रमुख प्राणी असून अनेक शतकापासून वाघांचे वास्तव्य येथे आहे. वाघांच्या बरोबरच मांजरी आहेत आणि नदीत मगरी आढळतात. डिसेंबर ते फेब्रुवारी हा येथे प्राणी पक्षी पाहण्यासाठी भेट देण्याचा कालावधी आहे.

 

10.  मदुमलाई अभयारण्य

तामिळनाडू राज्यात उटीपासून 65 कि.मी. अंतरावर निलगिरी पर्वत परिसरात 320 चौ. कि.मी. क्षेत्रात हे अभयारण्य पसरलेले आहे. हे मदुमलाई अभयारण्य हत्तींसाठी विशेष प्रसिद्ध आहे. या भागात भरपूर पाऊस पडतो. त्यामुळे येथे साग, बांबू आणि निलगिरीची दाट वने आहेत.

हत्तीशिवाय येथे वाघ, चित्ते, बिबळे, डुक्कर, चितळ, सांबर, हरिणे, माकडे इ. विविध जातींचे प्राणी व पक्षी भरपूर प्रमाणात आढळतात. सप्टेंबर ते डिसेंबर हा काळ येथे जाण्यासाठी उत्तम आहे. गुडालोर (Gudalur) हे शहर या अभयारण्यापासून 16 कि.मी. वर आहे. येथून उटी हे 64 कि.मी. अंतरावरील थंड हवेचे ठिकाण व रेल्वे स्टेशन आहे. तसेच 160 कि.मी. अंतरावर कोईमतूर विमानतळ आहे.

 

11. बांदिपूर अभयारण्य

हे अभयारण्य दक्षिण कर्नाटकमधील नांजूनगडपासून 55 कि.मी. अंतरावर आहे. या अभयारण्यात घनदाट जंगल असून तेथे विविध प्रकारचे प्राणी मोठ्या संखेने आढळतात. येथील जंगले पानझडी, सदाहरित प्रकारची मिश्र असून काही भागात काटेरी झुडुपे आढळतात. प्रसिद्ध मोयार नदी या अभयारण्यातूनवाहते. हे वाघांचे अभयारण्य असून या प्रकल्पाचे क्षेत्रफळ सुमारे 874 चौ. कि.मी. आहे. हत्ती ही येथे मोठ्या संखेने आढळतात.

याखेरीज सांबर, चितळ, डुकरे, हरिण, मोठी खार, उडती खार, वटवाघुळे, माकडे, चित्ते, रानटी कुत्रे, कोल्हे व इतर प्राणी आहेत. विविध प्रकारच्या पक्ष्यांत ससाणे, हॅरॉन, बगळे, सुतार व इतर पक्षी आढळतात. येथील प्राणी निरीक्षणाचा कालावधी नोहेंबर ते एप्रिल असतो. या अभयारण्याला जाण्यासाठी म्हैसूरचा विमानतळ 80 कि.मी. अंतरावर आहे. गुंडलपेट हे जवळचे शहर आहे. नांजूनगुड (Najungud) हे ५१ कि.मी. अंतरावरचे जवळचे रेल्वे स्टेशन आहे.

 

12. पेरियार राष्ट्रीय उद्यान

भारतातील केरळमधील पेरियार राष्ट्रीय उद्यान इडुक्की आणि पठाणमथिट्टा जिल्ह्यांमध्ये आहे. हे प्रामुख्याने हत्ती आणि वाघांचे अभयारण्य आहे. याचे क्षेत्रफळ 780 चौ. कि.मी. असून हे पेरियर नदीवर बांधलेल्या जलाशयाच्या परिसरात आहे. या भागात भरपूर पाणी उपलब्ध असून दाट जंगल सांबर, रानटी कुत्रे हे प्राणी व पक्षी आढळतात. येथे हत्ती, वाघ, डुक्कर, सांबर, रानटी कुत्रे हे प्राणी व पक्षी आढळतात. ऑक्टोबर ते मे या काळात हे क्षेत्र पर्यटनास उपयुक्त समजले जाते. हे भारतातील एक सुंदर राष्ट्रीय उद्यान समजले जाते.

 

13  पालामाऊ अभयारण्य

छोटा नागपूरच्या पठारावर हे अभयारण्य पालामाऊ राखीव जंगलामध्ये आहे. हे 970 चौ. कि.मी. क्षेत्रात पसरले आहे. हा भाग उंचसखल असून येथे पानझडी झाडांचे दाट जंगल आहे. हे उद्यान भारतीय चित्यासाठी प्रसिद्ध आहे. या अभयारण्यांत चित्ते मोठ्या प्रमाणांत आढळतात. याशिवाय वाघ, अस्वल, चितळ, हत्ती, निलगायी, सांबर इत्यादी प्राणी आढळतात. येथील प्राणी निरीक्षणाचा काळ ऑक्टोबर ते मे अखेर असतो.

 

14. मानस अभयारण्य

हे भूतानच्या सीमेवर आसाममध्ये गुवाहाटीपासून 175 कि.मी. वर आहे . याचे क्षेत्रफळ 2840 चौ. कि.मी. आहे. हे एक सुंदर अभयारण्य आहे. येथील भौगोलिक हवामान वन्यप्राणी व पक्ष्यांसाठी अनुकूल आहे. येथे हत्ती, गेंडे, सोनेरी माकड, रानरेड, डुक्कर, हरिण असे वन्यप्राणी व अनेक प्रकारचे पक्षी आढळतात.

 

भारतामध्ये वरील अभयारण्याशिवाय . मध्यप्रदेशांत ग्वाल्हेर जवळील शिवपुरी राष्ट्रीय उद्यान, पन्ना अभयारण्य, राजस्थानमधील जोधपूरजवळील धावा वन्यप्राणी अभयारण्य गुजरातमध्ये अहमदाबाद जवळील नलसरोवर अभयारण्य, कर्नाटकातील बंगलोरपासून जवळ बनेरघला राष्ट्रीय उद्यान तसेच रंगथिलू अभयारण्य, नागरहोळ अभयारण्य, अभयारण्य, केरळमधील वैनाड अभयारण्य महाराष्ट्रात ताडोबा -चंद्रपूर, नवेगांव -भंडारा-, पंच – नागपूर, मेळघाट –अमरावती , किनवट –नांदेड, माळढोक- सोलापूर, सागरेश्वर- सांगली, मायनी -सातारा, दाजीपूर- कोल्हापूर, रेहेकुरी-अहमदनगर, संजय गांधी उद्यान-मुंबई उपनगर, बोरिवली महत्वाची मानली जातात.

 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page